जपानमधील अन्नधान्य बाजारपेठ २०१९ ते २०२४ मध्ये ६.३ टक्क्यांनी वाढणार, असा सर्व्हेचा निकाल आहे. जपानची उपाहारगृह संस्कृती बदलत आहे आणि साखळी हॉटेल्सचे प्रमाण वाढते आहे. उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याचा कल वाढत चालला आहे. जपानी उत्पादकांना प्राधान्य मिळत आहे.
जपानमध्ये जपानबाहेरील प्रवासी मोठ्या प्रमाणात येतात, त्यामुळे हॉटेल्समध्ये जपानी पदार्थांबरोबरच बाहेरील देशांतील पदार्थही मिळू लागले आहेत. कॅफे संस्कृती विकसित झालेली असून, वेगवेगळ्या कॅफेमध्ये वेगवेगळ्या पदार्थांबरोबरच पारंपरिक जपानी पदार्थ खायला मिळतात. परदेशी प्रवासी एक अनुभव म्हणून अशा हॉटेल्समध्ये जातात आणि जपानी खाद्यपदार्थांची रेलचेल अनुभवतात. काही रेस्टॉरंटमध्ये भारतीय बैठकीसारखे बसून जेवण्याची सोय असते, ही मूळ जपानी संस्कृतीची रेस्टॉरंट आहेत.
रेस्टॉरंटच्या बाहेर प्रत्येक डिशची प्रतिकृती ठेवलेली असते आणि तुम्हाला अगदी तशीच डिश खायला मिळते. जपानमधील अनेक व्यावसायिक निर्णय अशा रेस्टॉरंटच्या ‘डिनर पार्टी’मध्ये होतात. या रेस्टॉरंटमध्ये महिलांपेक्षा पुरुष जास्त येतात. जपानी लोकांचा बाहेर जेवणाचा कल जास्त आहे. त्यामुळे रेस्टॉरंट खूप मोठ्या प्रमाणावर चालतात. १८ ते २४ वर्षे वयोगटातील मुले अधिक प्रमाणात बाहेर जेवतात. रेस्टॉरंट घरपोच सेवाही देतात. जपानमध्ये फास्ट फूड रेस्टॉरंट खूप मोठ्या प्रमाणात चालतात.
जपान आणि भारतातील शेती उत्पादने:
भारत जपानला दुसऱ्या महायुद्धानंतर काही गोष्टी निर्यात करू लागला आहे. हे संबंध कालांतराने दृढ होत गेले. भारतातून जपानला निर्यात होणाऱ्या गोष्टींमध्ये कृषी उत्पादने, ताजी फळे आणि सुकामेवा, फळांचे रस, भाजीपाला, तेलबिया, भाजीपाला, तेले, मासे व माशांपासून बनविलेले पदार्थ, शेंगदाणे, साखर, मध, काही धान्ये आणि डाळी, गहू, चहा, कॉफी, मसाले आणि औषधी वनस्पतींचा समावेश आहे. तंबाखू, चामड्याचे वस्त्र आणि वस्तू, हस्तकला वस्तू, कापूस, पशुखाद्ये यांचाही समावेश आहे. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ जपानला मोठ्या प्रमाणात निर्यात होतात.
जपानी आरोग्य, कामगार आणि कल्याण मंत्रालयाने काही मार्गदर्शक नियमांची सूची केलेली आहे. आयातदार आणि अन्नव्यवसाय संचालकांना मार्गदर्शक सूचनांनुसार, निर्यात करणाऱ्या देशांच्या कायद्यांचे आणि नियमांचे पालन करून अन्नाची निर्मिती व त्यावर प्रक्रिया केली जाते. याव्यतिरिक्त, उत्पादकाची स्थापना, सुविधा आणि उपकरणे, यांचे मानक संबंधित जपानी कायदा आणि अध्यादेशांमध्ये निश्चित केलेल्या आस्थापना, सुविधा आणि उपकरणे निर्देशित केल्याप्रमाणे असली पाहिजेत. अशाप्रकारे, खाद्यव्यवसाय संचालकांना दिशानिर्देश, मार्गदर्शक सूचना पाळून अन्नसुरक्षा व्यवस्थापनावर विशिष्ट लक्ष देता येते. हा अभ्यास करून भारतामधून विविध खाद्यपदार्थ निर्यात होऊ शकतात.
जपानबरोबर निर्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी तेथील खाद्यसंस्कृतीचा आणि जपानी भाषेचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
Credit Link – https://www.esakal.com/education-jobs/article-sujata-kolekar-japan-and-opportunity-368374
लेखकाचे नाव – सुजाता कोळेकर, सिनिअर डायरेक्टर, कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस इंडिया.