तरुण आणि काम करणाऱ्या व्यक्तींची कमतरता असल्यामुळे पुढील वैद्यकीय क्षेत्रांमध्ये जपानमध्ये संधी आहेत.
- नर्सेस- भारतामधील नर्सिंगचा कोर्स, ‘लेव्हल ३’पर्यंतचे जपानी भाषा आणि त्याच बरोबर मेडिकल क्षेत्रातील जपानी भाषेचा शब्दसंग्रह असावा. याचे विशेष कोर्सेस भारतामध्ये घेतले जातात. नर्सिंग शिकत असतानाच किंवा त्याआधीच जपानी भाषा शिकल्यास उपयोग होऊ शकतो. जपानमध्ये सुमारे २ लाख नर्सेसची गरज आहे. मुली आणि मुले दोन्हींना या पदासाठी संधी आहे. हे उमेदवार जपानच्या सीनियर नर्सेसबरोबर काम करतात.
- वॉर्ड बॉइज- बारावीपर्यंतचे शिक्षण झालेले, जपानी भाषेची ‘लेव्हल ३’ केलेली आहे त्यांना ही नोकरी मिळू शकते. सुमारे ५०-६० हजार वॉर्डबॉईजची जपानला गरज आहे.
- फार्मसी टेक्निशियन- फार्मसीचा भारतात केलेला कोर्स, जपानी भाषा ‘लेव्हल २’पर्यंत आणि त्याचबरोबर फार्मसी क्षेत्रातील जपानी भाषेचा शब्दसंग्रह आवश्यक आहे. या उमेदवारांना योग्य ते प्रशिक्षण दिले जाते.
- फिजिओथेरपिस्ट- भारतात घेतलेली फिजिओथेरपिस्टची डिग्री, जपानी भाषा ‘लेव्हल ३’पर्यंत आणि फिजिओथेरपिस्टसाठी लागणारा शब्दसंग्रह असल्यास ही नोकरी मिळू शकते. जपानमध्ये या व्यवसायाच्या उमेदवारांना जपानी भाषेतून एक परीक्षा द्यावी लागते. जपानी भाषा येत असल्यास भारतात केलेल्या अभ्यासाशी संलग्न परीक्षा असल्यामुळे वेगळा अभ्यास करावा लागत नाही.
- ज्येष्ठ नागरिकांची सेवा – जपानमध्ये २८.४ टक्के नागरिक ६५ वर्षांपुढील आहेत. त्यामुळे वृद्धसेवा ही गरजेची आहे. घरातून रोज सकाळी घेऊन जाऊन संध्याकाळी या वडीलधाऱ्या नागरिकांना आणून सोडले जाते. त्यांना जेवण, औषधे आदी सेवा दिली जाते. यासाठी मेडिकलचे थोडे ज्ञान आवश्यक असते. परंतु डॉक्टर किंवा नर्स असण्याची गरज नसते. याला पॅरामेडिकल असेही म्हणता येईल. या उमेदवारांना जपानी मात्र चांगले यावे लागते. त्याशिवाय संवाद साधणे शक्य नाही. या प्रकारच्या नोकऱ्या खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
- योगशिक्षक- भारतीय योगाभ्यास जगप्रसिद्ध आहे. अनेक जपानी नागरिक भारतात योगाच्या शिक्षणासाठी येतात. जपानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात योगाचे स्टुडिओ आहेत. तिथे योगा शिकवणारे शिक्षक तसेच उपशिक्षक अशा प्रकाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. जपानी भाषेमध्ये सूचना देता यायला पाहिजेत. ‘लेव्हल ३’ पर्यंत जपानी भाषेचा अभ्यास केला की ते जमू शकते.
वैद्यकीय क्षेत्रात संधी अजूनही आहेत, परंतु त्यासाठी जपानची वेगळी परीक्षा द्यावी लागते. ती जपानी भाषेमध्ये असते. माझे काही भारतीय डॉक्टर मित्र मी जपानला असताना तिथे हॉस्पिटलमध्ये ठराविक काळासाठी काम करण्यासाठी आले होते, परंतु ते मुख्य डॉक्टर्सना असिस्ट करत होते. अनुभव चांगला आल्याने ते वारंवार जपानला जाऊ लागले आहेत. जपानचे वैद्यकीय तंत्रज्ञान शिकल्याचा त्यांना नक्की उपयोग होतोय. या आधुनिक देशात वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी नक्की जावे आणि काही कालावधीसाठी तरी नक्की काम करावे.
Credit Link – https://www.esakal.com/education-jobs/great-opportunity-doctors-and-nurses-349965
लेखकाचे नाव – सुजाता कोळेकर, सिनिअर डायरेक्टर, कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस इंडिया.