मी २००४ मध्ये जपानमधील पहिला जॉब सुरू केला, तेव्हा सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५८ वर्षे होती.
जपानमध्ये साधारण वयोमान १०० वर्षांच्या पुढे आहे आणि २५-६० वर्षे वयोगटातील काम करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होते आहे. त्यामुळे जपानमध्ये काम करणाऱ्या लोकांचा खूप तुटवडा आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन जपान सरकारने सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्ष केले होते.
मागच्या वर्षी आम्ही जेव्हा एका ‘स्किल पोझिशन’साठी उमेदवार पाहत होतो, तेव्हा एक ६८ वर्षे वयाच्या व्यक्तीने अर्ज केला होता. तेव्हा सेवानिवृत्तीचे वय ६५ असल्यामुळे आणि तशा स्किल्सची खूप गरज असल्यामुळे आम्हाला त्यांना कॉन्ट्रॅक्ट तत्त्वावर कामावर घ्यावे लागले. महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की काम करण्यासाठी लागणाऱ्या २५-६० वर्षांच्या उमेदवारांची कमतरता असल्यामुळे जपानमध्ये ६० वर्षांनंतरही काम करण्याची संधी मिळते; किंबहुना ती अर्थव्यवस्थेची गरज बनली आहे.
जपानी सरकारने २०२० च्या मे महिन्यात कंपन्यांना खालील सूचना केली आहे…
- कामगारांची कमतरता भरून काढण्यासाठी आणि सगळ्या लोकांना काम मिळण्यासाठी सेवानिवृत्तीचे वय ७० करावे.
- त्याच कंपनीमध्ये जॉब नसल्यास दुसऱ्या त्याच क्षेत्राच्या कंपनीमध्ये जॉब मिळवून द्यावा किंवा त्यांना थोडे शिक्षण देऊन जॉब करता येईल, अशा प्रकारे त्यांना तयार करावे.
- ६५ वर्षांपर्यंत काम करणाऱ्या लोकांकडे खूप ज्ञान असते. त्या ज्ञानाचा उपयोग कंपनीला व्हावा आणि लोकांना पण त्याचा मोबदला मिळावा, हाही एक उद्देश आहे.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे म्हणाले, ‘निरोगी, इच्छुक वृद्धांनी त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा.’ हा मुद्दा संसदेसमोर ठेवण्यात आला आहे आणि त्याच्यावर चर्चा सुरू आहे. जपानमध्ये सध्या काम करत असलेले ७५ टक्के युवक २०४० पर्यंत ७५ वर्षांचे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे असतील, असा अहवाल राष्ट्रीय लोकसंख्या व सामाजिक सुरक्षा संशोधन संस्थेने दिला आहे. त्यामुळे २०४० पर्यंत ज्या घरातील कमावती व्यक्ती ७५ वर्षांची किंवा त्यापेक्षा अधिक होईल अशी घरे १ कोटी २१ लाख ७० हजार होतील. या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून कमीत कमी ७० वर्षे सगळ्यांनी काम करावे, असा प्रस्ताव आहे.
Credit Link – https://www.esakal.com/education-jobs/article-sujata-kolekar-japan-and-opportunity-356015
लेखकाचे नाव – सुजाता कोळेकर, सिनिअर डायरेक्टर, कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस इंडिया.