माझा २००४मध्ये पहिला जपानी व्हिसा व्यावसायिक होता. तो मिळवण्यासाठी मला ४ आठवडे लागले होते. नंतर तो व्हिसा ‘वर्क व्हिसा’मध्ये बदलण्यासाठीही मला जवळजवळ ८ आठवडे लागले. मागील दशकांच्या तुलनेत भारतीयांसाठी जपान व्हिसा मिळण्याची प्रक्रिया खूप सोपी झाली आहे. हा बदल प्रकर्षाने जाणवतो.
जपान हा एक सुंदर देश असल्यामुळे जपानला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्याही खूप वाढली आहे. पूर्वी जपानचा व्हिसा मिळण्यासाठी खूप अवघड प्रक्रिया होती, परंतु जपानच्या पर्यटन कार्यालयाने २ कोटी पर्यटकांचे उद्दिष्ट समोर ठेवून व्हिसाची प्रक्रिया सोपी केली.
भारतीयांसाठी जपान व्हिसाचे प्रकार –
जपान विविध प्रकारचे व्हिसा पर्याय देतात, जे सिंगल किंवा मल्टिपल असू शकतात आणि यात समाविष्ट आहेत.
- पर्यटक व्हिसा – हा व्हिसा ३ महिन्यांच्या कालावधीसाठी मिळतो. तो ३-५ दिवसांमध्ये मिळतो.
- व्यवसाय व्हिसा – व्यवसायाच्या उद्देशाने जपानला जायचे आहे त्यांच्यासाठी हा व्हिसा डिझाइन केला आहे. तो जास्तीत जास्त ९० दिवसांसाठी मंजूर केला जातो आणि केवळ बाजारपेठ संशोधन, व्यवसाय वाटाघाटी, परिषद इ. कारणांसाठी वापरला जाऊ शकतो. हा व्हिसा ३-५ दिवसांमध्ये मिळतो. तो ३ महिन्यांपासून जास्तीत जास्त ५ वर्षांसाठी वैध असू शकतो.
- वर्क व्हिसा – जपानमध्ये नोकरी किंवा कामाचा व्हिसा अनिवार्य आहे. वर्क व्हिसा हा कमीत कमी १ वर्ष ते ५ वर्षासाठी असतो. यासाठी ज्या कंपनीमध्ये नोकरी करणार आहात, त्या कंपनीची कागदपत्रे जमा करणे अनिवार्य असते. हा व्हिसा मिळण्यासाठी २ ते ६ आठवडे लागू शकतात. यामध्ये सगळी कागदपत्रे व्यवस्थित असतील तर व्हिसा लवकर मिळतो. वर्क व्हिसा मिळवण्यासाठी जपान पॉइंट सिस्टिम वापरते. यामध्ये ॲडव्हान्स ॲकाडमिक रिसर्च ॲक्टिव्हिटीज, ॲडव्हान्स स्पेसिलायझेशन/टेक्निकल ॲक्टिव्हिटीज, ॲडव्हान्स बिझनेस मॅनेजमेंट ॲक्टिव्हीटीज् यांचा समावेश होतो. यामध्ये उमेदवाराचे वय, शिक्षण, जपानी भाषेची लेव्हल, कामाचा अनुभव इत्यादींचा समावेश असतो.
जपानमध्ये कायमस्वरूपी राहण्यास अधिकृत असल्यास, ‘कायमस्वरूपी रहिवासी’ (पर्मनंट रेसिडेंट) व्हिसा मिळतो. त्यामुळे तुम्ही तिथे कितीही वर्ष राहू शकता. याच्या अटी मागील २-३ वर्षांमध्ये भारतीयांसाठी शिथिल करण्यात आलेल्या आहेत.
अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सध्या काही एजन्सी विद्यार्थी, कुशल कामगार, टीआयटीपी आणि जपानमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना पैसे घेऊन व्हिसा देण्याचे कबूल करतात. असे लोक या विळख्यात अडकतात आणि त्यांची फसवणूक होते. त्यांना बनावट रिफ्यूजी व्हिसा दिला जातो. या लोकांना जपानमध्ये राहता येत नाही. त्यांनी आधीच खूप खर्च केलेला असतो आणि हा व्हिसा वैध नसल्यामुळे त्यांना लगेचच मायदेशी परत यावे लागते. त्यामुळे अशा एजन्सी आणि फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहावे.
Credit Link – https://www.esakal.com/education-jobs/article-about-japan-visa-indians-338369
लेखकाचे नाव – सुजाता कोळेकर, सिनिअर डायरेक्टर, कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस इंडिया.