बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या लोकांना जपानकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. त्यांच्या बांधकाम व्यवसायात बरेच नियम आहेत आणि त्या नियमांचे कटाक्षाने पालन केले जाते.
परदेशातील संधी, असा विषय निघाल्यावर सगळ्यांना फक्त आयटी क्षेत्रातील संधी समोर दिसतात. जपानमध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये प्रचंड संधी आहेत, हे मी खूप जपानी भाषा शिकणाऱ्या उमेदवारांना वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न करत असते.
जपान ही जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. जपानमध्ये अनेक मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी सुमारे ८०% उलाढाल केली आहे. त्यात जगातील पहिल्या ३० कंत्राटदारांपैकी पाच जपानी आहेत. याव्यतिरिक्त, वीसहून अधिक जपानी दिग्गजांची जागतिक वार्षिक उलाढाल १ अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे; जी त्यांच्या आंतरराष्ट्रीय उपस्थितीची जाणीव करून देते. जपानची गुणवत्ता आणि कार्यक्षमता जगामध्ये प्रसिद्ध आहेच. जपानच्या काही बांधकाम कंपन्या ४०० वर्षांपासून जगप्रसिद्ध आहेत. बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या लोकांना जपानकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. त्यांच्या बांधकाम व्यवसायात बरेच नियम आहेत आणि त्या नियमांचे कटाक्षाने पालन केले जाते.
जपानमध्ये पुढील वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा होणार असल्याने सरकार पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे.
योकोसुकामधील ऑइल आणि गॅस प्लांट २०२३ पर्यंत बांधून पूर्ण होणार आहे.
वाढत्या वयाच्या लोकांसाठी नवीन प्रकारची सर्व सुविधा असणारी घरे, तसेच डे केअर सेंटर बांधली जाणार आहेत.
कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लोक कसे काम करू शकतील, याचा विचार जपान सतत करत असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या रिसर्च प्रोजेक्टवर काम करणारे लोक हवे असतात.
जपानमध्ये भूकंप, टायफून आणि त्सुनामी अशी नैसर्गिक संकटे येतात; तरीही जपानमध्ये ‘टोकियो स्काय ट्री’ नावाची ६३४ मीटर उंच इमारत आहे. मिडटाउन नावाची ५४ मजली, तर तोरणोमन हिल्स नावाची ५२ मजली इमारत आहे. अशा अगणित उंच इमारती देशात असल्या, तरी नैसर्गिक संकटांमुळे त्यांना कोणताही धोका पोचणार नाही, याचे शास्त्र त्यांनी अवगत केलेले आहे. या तंत्रज्ञानामुळे जगभरात जपानी अभियंत्यांना कन्सल्टंट्स म्हणून मोठी मागणी आहे.
बांधकाम व्यवसायात बऱ्याच ठिकाणी त्यांनी यंत्रमानवांचा वापर सुरू केला आहे, त्याला जे प्रोग्रामिंग लागते, ते स्थापत्य अभियंत्याने करून देणे अपेक्षित आहे. भारतातील बरेच बांधकाम व्यावसायिक जपानमध्ये त्यांच्या बांधकाम व्यवसायाचा अभ्यास करायला जातात. हा अभ्यास काही आठवडे ते काही वर्षांचा असू शकतो. बांधकाम व्यवसायाबरोबरच शहरांचे नियोजन करणे, हे महत्त्वाचे क्षेत्र आहे.
जपानी शहरांचे नियोजन या विषयात मास्टर्स करणारे बरेच उमेदवार आहेत. जपान काही वर्षांपासून बांधकाम व्यवसायात काम करण्यासाठी लागणारे कामगार भारत, व्हिएतनाम, नेपाळ, कंबोडिया या देशांमधून मागवत आहे. त्याचबरोबर त्यांना स्थापत्य अभियंत्यांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. याच क्षेत्रात काम करताना बरेच दुभाषेही लागतात. त्यामुळे बांधकाम व्यवसायाची चांगली माहिती व जपानी भाषा येत असलेल्यांसाठी ही सुवर्णसंधीच आहे. जपान भारतामध्ये बरीच गुतंवणूक करत आहे, बऱ्याच टाउनशिप प्लॅन होत आहेत. त्यामुळे तिथेही जपानी पद्धतीची घरे, शाळा, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि कंपन्यांच्या बांधकामासाठी जपानी बांधकामाचा अभ्यास केलेले उमेदवार लागणार आहेत.
बांधकाम व्यवसायात जपानी शिकणाऱ्या उमेदवारांना मोठी संधी मिळू शकते. त्यासाठी जपानी भाषा शिकण्याचा नक्की विचार करावा.
Credit Link – https://www.esakal.com/education-jobs/sujata-kolekar-write-article-opportunities-construction-business-374381
लेखकाचे नाव – सुजाता कोळेकर, सिनिअर डायरेक्टर, कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस इंडिया.